आस्थमा हा दीर्घकालीन आजार आहे, व औषधाने नियंत्रित ठेवता येतो

जागतिक दमा दिन (२ मे २०२३)

        दमा” ह्या रोगाविषयी माहिती देणे आणि जनजागृती करणे ह्या दृष्टीने “जागतिक दमा दिन” हा जागतिक स्तरावरील एक महत्वाचा उपक्रम आहे. Global Initiative for Asthma (GINA) ह्या संस्थेने वर्ष २०२३ मधील जागतिक दमा दिनासाठी “सर्वांसाठी दमा दक्षता” (Asthma Care for ALL) हा विषय निवडला आहे. दमा उपचारातील त्रुटी दूर करणे हे जागतिक दमा दिनाचे उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार वर्ष २०२१ पर्यन्त जवळपास १५ ते २० दशलक्ष भारतीयांना दम्याचा त्रास होता आणि त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. तथापि योग्य वेळी दक्षता आणि उपचार घेतल्यास हा रोग टाळता येऊ शकतो.


दमा हा श्वसनमार्गाशी संबंधित एक तीव्र/ दीर्घकालीन विकार आहे, जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. ह्या विकारात श्वसनमार्ग अति प्रमाणात प्रतिक्रियाशील होऊ शकतो. दम्यामुळे, विशेषतः रात्री किंवा पहाटे, वारंवार घरघर येणे, गुदमरणे, छाती आवळणे आणि खोकला येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. फुफ्फुसामधील श्वसनमार्गातील अडथळ्यांमुळे हे दुष्परिणाम दिसून येतात. तथापि हे अडथळे नैसर्गिकरीत्या अथवा उपचारानेही दूर होऊ शकतात.

रोगपरिस्थितीविज्ञानानुसार आकडेवारी२०१९ सालामध्ये अंदाजे २६२ दशलक्ष लोकांना दम्याचा विकार जडला आणि अंदाजे ४ लाख ६१ हजार लोक दम्यामुळे मृत्यूमुखी पडले. दम्याच्या प्रसाराची देशांतर्गत आणि विविध देशांमधील आकडेवारी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. बहुतेक सर्वेक्षणांमध्ये भारतात दम्याचे प्रमाण सुमारे ७ % असल्याचे आढळून आले आहे. तथापि, वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये हे प्रमाण २% ते १७ % पर्यंत नोंदवले गेले आहे. हा रोग कोणत्याही वयात होऊ शकतो, तथापि प्रामुख्याने वयाच्या १० व्या वर्षाआधी ह्याचा त्रास सुरू होते. मुलांमध्ये दम्याचे प्रमाण हे मुलींपेक्षा दुप्पट असते, तर प्रौढांमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रमाण सामान्यतः समान असते. दम्याचा प्रसार विकसनशील देशांपेक्षा विकसित देशांमध्ये अधिक आहे.

अस्थमाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. कधी कधी हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते. दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अ‍ॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील ‘इसोनिओफिल’(eosinophil)  नामक घटक वाढतो. त्यामुळे श्‍वासवाहिन्यांवर सूज येते. सोबतच धुम्रपान, वायू प्रदूषण, धूळ, धूर, कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि अगरबत्ती या सारख्या सुगंधित वस्तूंपासून देखील अस्थमा होऊ शकतो. काही अँटी-बायोटिक औषधे, दैनंदिन जीवनातील तणाव आणि सिगरेटची सवय देखील अस्थमा होण्याची संभावना वाढवते.

रोगनिदानशास्त्रानुसार दम्याचे दृष्यस्वरूप: 

स्थूल स्वरूप: दीर्घकालीन अथवा तीव्र दम्यामुळे मृत पावलेल्या रुग्णांची फुफ्फुसे आकाराने मोठी आणि जास्त विस्तारीत असतात. छातीचे विच्छेदन केल्यानंतरही तो आकार सामान्य होत नाही. श्वसनमार्गाची जाडी वाढलेली दिसून येते आणि श्वसनमार्ग चिकट स्त्रावाने व्यापलेला असतो.

सूक्ष्म स्वरूप: दम्याचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे श्वासनलिकेच्या सर्वात आंतरिक थराची जाडी वाढणे, श्वासनलिकेचे स्नायू आकाराने वाढणे, क्षतिग्रस्त अधिस्तर (epithelium), श्वासनलिकेच्या पेशींवर सूज दिसून येणे, ज्यात सर्वात महत्वाच्या पेशी म्हणजे रक्तातील पांढऱ्या पेशी ‘इसोनिओफिल’ (eosinophil) ह्या होत. गंभीर स्वरूपाच्या दम्यामध्ये लघुश्वासनलिकांचा मार्ग श्लेष्माने भरलेला आढळतो.

पर्यावरण आणि प्रदूषणाचे परिणाम: सामान्यतः थंड आणि कोरड्या वातावरणात, विशेषतः जेव्हा जोरदार वारा सुटतो, तेव्हा दम्याचा तीव्र प्रकोप होतो. वाहतूकीच्या प्रदूषणामुळेही दम्याची लक्षणे वाढू शकतात. हवेमधील सल्फरडायऑक्साइड, ओझोन, डिझेल यांसारखे वायुप्रदूषक कणदेखील दम्याची लक्षणे वाढवू शकतात. घरातील वायू प्रदूषण हे देखील दमा प्रकोपाचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्वयंपाक घरातील गॅसचा धूर आणि आसपासच्या इतर व्यक्तीनी केलेल्या धूम्रपानाचा धूर यामुळेही रुग्णांमध्ये दम्याची लक्षणे वाढू शकतात. रंग, स्प्रे आणि धुर हे देखील दमा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे वाढवू शकतात. दम्याची कारणे अद्याप पूर्णपणे समजलेली नाहीत. आनुवंशिकता आणि वातावरणातील घटक यांच्या संयोगाने दमा होऊ शकतो. तथापि हे घटक दमा वृद्धीसाठी संयुक्तपणे कसे कारणीभूत होतात हे मात्र अजूनही अज्ञात आहे.

दम्याची लक्षणेदम्याच्या लक्षणांमध्ये वारंवार घरघर येणे, श्वास गुदमरणे, छाती आवळणे आणि खोकला येणे यांचा समावेश होतो. खोकल्यामुळे फुफ्फुसात कफयुक्त थुंकी तयार होते मात्र अनेकदा हा कफ बाहेर निघत नाही. दम्याच्या तीव्र प्रकोपातून बर्‍या होणार्‍या रुग्णांमध्ये, eosinophils नावाच्या पांढऱ्या रक्तपेशींमुळे हा कफ पू-सदृश्य दिसू शकतो. दम्याची तीव्रता रात्री व पहाटे वाढते, तसेच व्यायाम केल्यानंतर किंवा थंड हवेमुळेही वाढते. अशा प्रकारच्या बाधक घटकांमुळे उत्पन्न होणारी ही लक्षणे काही रुग्णांमध्ये क्वचित आढळतात तर काही रुग्णांमध्ये वारंवार, सतत आणि सहज दिसून येतात.

दम्याचे निदान करताना रुग्णांमधील लक्षणांचे स्वरूप, उपचारास कालानुरुप मिळालेला प्रतिसाद आणि स्पायरोमेट्री फुफ्फुस कार्यक्षमता चाचणी यांचा आधार घेतला जातो. दम्याचे वर्गीकरण त्याच्या लक्षणांची वारंवारता, एका सेकंदात बलपूर्वक उच्छवास केला असता होणारे फुफ्फुसाचे घनफळ (FEV1) आणि उच्छवासाचा कमाल दर यांच्या आधारे केले जाते. दम्याचे वर्गीकरण एटोपिक किंवा नॉन- एटोपिक असेही केले जाऊ शकते. येथे “Atopy” हा शब्द , रुग्णामध्ये प्रथम वर्गवारीतील अतिसंवेदनशीलता विकसित होण्याची प्रवृत्ती दर्शवतो.

उपचार: या निकषांवर आधारित, रुग्णाची लक्षणे कमी करण्यासाठी योग्य उपचार केले जाऊ शकतात. लहान-अभिनय बीटा-अ‍ॅगोनिस्ट, दीर्घ-अभिनय बीटा-अ‍ॅगोनिस्ट, मस्करीनिक विरोधी, आणि इनहेल्ड आणि सिस्टेमिक ग्लुकोकॉर्टिकोइड्स ही सर्वात सामान्य औषधे वापरली जातात.

होय, दम्याच्या धोक्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अयोग्य/ अपूर्ण उपचार केलेला दमा काळानुसार आणखी गंभीर होतो. ज्या रुग्णांवर दम्याचा उपचार झाल नाही, त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही दमा नसलेल्या लोकांच्या तुलनेत कमी असते. दम्याचा उपचार घेतलेल्या रुग्णांना, उतारवयात त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वेगाने खालावणार नाही, अशी खात्री देण्याइतपत दम्याच्या आधुनिक उपचार पद्धतीचा कालावधी प्रदीर्घ नाही. तथापि, बहुतेक तज्ञांच्या मते, नियमित व प्रतिबंधात्मक उपचारांमुळे दम्याची तीव्रता वाढू न देता फुफ्फुसाची कार्यक्षमता टिकवता येते.

परिणाम: “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)” याच्या तुलनेत दीर्घकालीन दम्याचे परिणाम ठळकपणे दिसून येत नाहीत. दम्यापासून पूर्ण मुक्तता मिळण्याची शक्यता असली तरी पूर्ण रोगमुक्तीचा दर फारच कमी आहे आणि तो दर केवळ सौम्य स्वरुपात दमा झालेल्या रुग्णांपुरताच मर्यादित आहे. काही दम्याच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेमध्ये कायमस्वरूपी बिघाड होतो आणि धूम्रपान करणाऱ्यांमध्ये असा कायमस्वरुपी बिघाड होण्याची संभावना जास्त असते.

प्रतिबंध: दमा उपचाराचे योग्य नियोजन हाच दमा टाळण्यासाठी असलेला सर्वोत्तम मार्ग आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांनी विकसित केलेल्या नियोजित पद्धतीच्या उपचारामुळे, रुग्ण दम्याच्या नियंत्रणाखाली न येता, दमा रुग़्णाच्या नियंत्रणाखाली येऊ शकतो. अशा प्रभावी उपाययोजनेने रुग्ण :

  1. दम्याची लक्षणे दिसून न येता सक्रिय राहू शकतो.
  2. व्यायाम करू शकतो आणि खेळात सहभागी होऊ शकतो.
  3. दम्याच्या लक्षणांशिवाय रात्रभर निवांत झोपू शकतो.
  4. शाळेत किंवा कामावर नियमितपणे जाऊ शकतो.
  5. फुफ्फुसे जास्तीत जास्त प्रमाणात मोकळी ठेवू शकतो.
  6. दम्याच्या औषधांमूळे होणारे दुष्परिणाम पूर्णत: अथवा अंशत: टाळू शकतो.
  7. गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे रुग्णालयास आपत्कालीन जाणे किंवा दाखल होणे टाळू शकतो.

मुख्य संदेश: दमा पुर्णत: बरा होऊ शकत नाही पण तो योग्य प्रकारे नियंत्रित केला जाऊ शकतो. श्वसनमार्गाद्वारे केलेला औषधोपचार हा दम्यासाठी आदर्श उपचार आहे. प्रतिबंधक आणि निवारक अशी दोन्ही औषधे योग्य प्रकारे वापरली पाहिजेत. रुग्णांना दम्याविषयी व्यवस्थित माहिती देणे हेच दमा नियंत्रणाचे मुख्य साधन आहे. डॉक्टरांनी रुग्णांना इनहेलेशन तंत्र व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे आणि रुग्णांकडून हे तंत्र व्यवस्थित वापरले जात आहे किंवा नाही ते तपासले पाहिजे. दमा आणि इनहेलेशन थेरपी याबाबत असणार्‍या मिथकांचा व अफवांचा विमोड करण्यासाठी समाज आणि डॉक्टरांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.


Comments

Post a Comment